मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे आणि कल्याण परिसराला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सुमारे ४४२ किलोमीटर लांबीचा, सहा पदरी आणि पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल्ड असलेला हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा देणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) त्याची उभारणी केली जाणार आहे.
या एक्सप्रेसवेमुळे कल्याण ते लातूर प्रवासाचा वेळ सध्याच्या १० ते ११ तासांवरून अवघ्या ४ तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. ठाणे, कल्याण, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना हा महामार्ग थेट जोडणार आहे. प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांमधील माळशेज घाटात तब्बल ८ किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे घाटातील धोकादायक वळणे, वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
या एक्सप्रेसवेचे अलाइनमेंट पूर्ण झाले असून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या विरार-जेएनपीटी लिंकशी तसेच रिंग रोड नेटवर्कशी या महामार्गाची जोडणी केली जाणार असल्याने मराठवाड्यातून जेएनपीटी बंदरापर्यंत जलद आणि सुलभ मालवाहतूक शक्य होणार आहे. याशिवाय कल्याण-लातूर एक्सप्रेसवेचा विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरशी थेट संपर्क होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होईल.
लातूरजवळ या एक्सप्रेसवेची जोडणी नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेशी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा यांच्यातील हायस्पीड कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. तसेच सूरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरशी जोडणी झाल्यास दक्षिण भारताकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे. कल्याण, मुरबाड, माळशेज घाट, ओतूर, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंबा आणि अंबाजोगाईमार्गे हा महामार्ग लातूरपर्यंत पोहोचणार आहे. भविष्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बिदर आणि गुलबर्गापर्यंत त्याचा विस्तार करण्याचा प्रस्तावही आहे.
कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यास मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यातील अंतर कमी करण्यासोबतच व्यापार, उद्योग, रोजगार आणि मालवाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.