बुधवार दि.१९ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अलिबाग – पेण मार्गावर कार्लेखिंडीतील अवघड वळणावर आरसीएफ थळ कारखान्यातुन तुर्भे – मुंबईकडे रसायनाची वाहतूक करणारा टँकर एका कार चालकाने हुल दिल्यामुळे कारला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी होऊन अपघात झाला आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर टँकरचालक पळून गेला तर क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे, अपघातानंतर अपघातग्रस्त टँकर मधून वायुगळती सुरू झाली होती, या अपघाताची खबर मिळाल्यानंतर अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव टँकरमधील रसायनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरसीएफ येथील अग्निशमन दलाला व आरसीएफ प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी व कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना व वाहनचालकांना होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मात्र वायुगळती मुळे कोणताही धोका नसल्याचे आरसीएफ प्रशासकीय अधिकारी यांनी यावेळी सांगितल्याने पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त टँकर काढताना काही काळ सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवून नंतर वाहतूक पूर्ववत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर अपघातग्रस्त टँकर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काढण्यात आले नव्हते, परंतु काहीवेळात क्रेनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास अलिबाग पोलीस करत आहेत.