स्वीकृत नगरसेवकपदी ॲड. प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

पनवेल | प्रतिनिधी 
शिव सेनेचे महानगरप्रमुख आणि पनवेलमधील तरुण, सुशिक्षित नेतृत्व ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण  यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज दाखल केला. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकुर यांना दूरध्वनीवरून सोमण यांच्या नावाची सूचना केल्यानंतर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळत पनवेलकरांना उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांनी शिंदे तसेच खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले.
प्रभाग १८ मधील दावेदारी सोडल्यानंतर महायुतीचे समन्वयक म्हणून महापालिका निवडणुकीत जबाबदारी पार पाडणाऱ्या सोमण यांनी विविध सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर काम केले आहे. ड्युअल टॅक्स, मालमत्ता कर, डायलिसिस सेंटर, आरक्षित जातींच्या शिष्यवृत्ती, हॉकर्स लायसन्स, प्रदूषण, पनवेल रेल्वे स्थानकातील रिक्षा युनियन, कामगार प्रश्न अशा विषयांवर त्यांनी पुढाकार घेतला. कोविड काळात गणपती विसर्जनासाठी राबवलेली अभिनव पद्धत तसेच गरीब विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन उपक्रमालाही एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक मदत दिली होती. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या भव्य प्रीमियरचे आयोजनही त्यांनी केले होते.
महापालिका, पोलीस आणि महसूल विभागात सामाजिक पकड व स्वच्छ प्रतिमा ही सोमण यांची जमेची बाजू मानली जाते. उपजिल्हाप्रमुख परेश पाटील यांनी “सभागृहात अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असलेला शिवसैनिक म्हणून प्रथमेशचेच नाव योग्य” असल्याचे मत व्यक्त केले. महायुतीचे नेते खासदार श्रीरंग बारणे, पक्ष सचिव संजय मोरे तसेच मंत्री उदय सामंत आणि भरत गोगवले यांनीही सोमण यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. येत्या सहा तारखेला पालिकेच्या महासभेत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देण्यात आली.