खा. सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनं बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचं उपोषण अखेर सहाव्या दिवशी स्थगित

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
 बालगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयासमोरील बेमुदत उपोषण अखेर सहाव्या दिवशी तूर्तास स्थगित करण्यात आले. खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर आणि मंत्रालयात संयुक्त बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
पेण येथील उपोषणस्थळी भेट देऊन खासदार तटकरे यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाची भूमिका, पुनर्वसन कायदा, मोबदला तसेच सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्याची मागणी या सर्व मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय झाला. यावेळी त्यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून शुक्रवार, ६ मार्च रोजी मंत्रालयात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सिडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास मी स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसेन, असा इशारा खासदार तटकरे यांनी दिला. बैठकीत सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर सहाव्या दिवशी संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव, वासुदेव पाटील आणि मधुकर हादगे यांना नारळ पाणी देत उपोषण सोडवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.