राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील चार उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 7 रिक्त जागांपैकी महायुतीत भाजपच्या वाट्याला 4 जागा आल्या असून त्या जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले.
शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या यादीचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. अखेर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने खालील नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. खालील उमेदवारांचा समावेश
रामदास आठवले: केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष
विनोद तावडे: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस
माया चिंतामण ईवनाते: भाजप नेत्या
रामराव वडकुते: भाजप नेते
महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता मजबूत मानली जात आहे. राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया सुरू असून भाजपने आतापर्यंत 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. नामांकन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 मार्च 2026 असून मतदान 16 मार्च 2026 रोजी होणार आहे. इतर राज्यांतील उमेदवारांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती, मात्र महाराष्ट्रातील यादी जाहीर करण्यात विलंब झाला होता.
महायुतीच्या उर्वरित जागांबाबतही राजकीय हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रत्येकी एक उमेदवार उभा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या निवडणुकीत महायुतीचे गणित स्पष्ट झाले असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.