रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेली चार पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपले असून गेली दोन दिवस मोठ्या प्रमाणात पावसाचा थैमान सुरू आहे.तर मुंबई गोवा महामार्ग लगत सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस जिंदाल कंपनी समोरील मार्गावर गेली दोन दिवस पाणी साचून राहिल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली त्यामुळे जवळपास चोवीस तासहून अधिक काळ उलटून देखील येथील नाल्याची पाणी पातळी कमी होत नसल्याने वाहन चालक आणि प्रवासी मार्गावरच रखडले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, काल पासून आणि आज पहाटेपासून वाहतूक कोंडीत रखडलेल्या प्रवासी आणि वाहन चालकांसाठी कोलाड खांब परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून रखडलेल्या प्रवाशांची पाण्याची आणि खाण्याची गैर सोय होऊ नये यासाठी त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेत पाणी आणि आल्पोहर देण्याचे मोठे कार्य युद्ध पातळीवर सुरू केले आहे. तासंतास रखडलेले प्रवासी वर्गातून या पूरपरिस्थीमुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून ती नियंत्रित करण्यास युद्ध पातळीवर परिश्रम घेत आहेत.
सुकेळी येथील सिमलेस जिंदाल कंपनी यांच्या समोरील नाला हा पुराच्या पाण्याने भरून वाहत असल्याने ते तुडूंब भरल्याने हे पाणी गेली दोन दिवस मार्गावर साचून राहिल्याने कोलाड कडून मुंबई कडे जाणारी वाहतूक तसेच मुंबई कडून कोलाडकडे येणारी वाहतूक ही पूर्ण ठप्प झाली असल्याने दोन्ही बाजूने लांबच लांब रांग किमान तीन ते चार किलो मीटर अंतरावर लागल्या असल्याचे दिसून येत आहे.
सदरच्या नाल्यात कंपनी प्रशासनाने मोठी जाळी टाकली असल्याने या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे मात्र या बाबत कंपनी प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे तर नाल्यातच भली मोठी जाळी टाकून पाणी अडविण्याचे काम करणाऱ्या कंपनी प्रशासनाला शासन प्रशासक कोणती कारवाही करणार यावरच सारे प्रश्न उपस्थित केले जात आहे.