गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोरदार तडाखा दिला. शहरातील अनेक भागांत मोठमोठी झाडे उन्मळून पडली, रस्त्यांवर पाणी साचले, काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आणि जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. मात्र या नैसर्गिक संकटात अलिबाग नगर परिषद प्रशासनाने तत्काळ यंत्रणा कार्यान्वित करत युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवून नागरिकांना मोठा दिलासा दिला.
वादळी वाऱ्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर झाडे कोसळल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे बचावकार्य करताना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र कोणतीही तमा न बाळगता यंत्रणेने जेसीबी, कटर आणि अन्य आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने पडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
शहरातील सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासह धोकादायक झाडांची पाहणी, नुकसानग्रस्त ठिकाणांची तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र कार्यरत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी विविध भागांची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक सागर भगत, ऋषिकेश माळी, अश्विनी ठोसर, संतोष गुरव, समीर ठाकूर, जमाल सय्यद, अनिल चोपडा, सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर, भावेश पेरेकर, शेकाप कार्यकर्ते मुन्ना वाईकर, भाजपचे मानस कुंटे तसेच अनेक स्थानिक कार्यकर्ते मदतकार्यात सक्रिय सहभागी झाले.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने अलिबाग नगर परिषद प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पडलेल्या वीजतारा व धोकादायक झाडांपासून दूर राहावे तसेच कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तातडीने नगर परिषद किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.