तालुक्यातील दुर्गम क्षेत्रपाळ गावाबाहेर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उंच डोंगरावरून कोसळलेली दरड आश्चर्यकारकरीत्या गावठाणाबाहेरच राहिल्याने क्षेत्रपाळ गावातील एकाही घराला अथवा व्यक्तीला धोका पोहोचला नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पोलादपूर तालुक्यात 265 मि.मी. रविवारी दिवसरात्र पाऊस पडून एकूण सरासरी पावसाची नोंद 1264 मि.मी. झाली. तालुक्यातील कामथी, ढवळी, घोडवनी, चोळई आणि सावित्री पाचही नद्या तुडूंब भरुन वाहू लागल्या. पोलादपूर शहरातील सर्वच घाट पुरात बुडवून उत्तरवाहिनी सावित्री नदी खळाळत जुना महाबळेश्वर रस्त्यावरून वाहू लागली. बंद आंबेनळी घाटातील रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना कायम असून कशेडी घाटातील भुयारी मार्गापलिकडेदेखील कशेडी टॅप पोलीस चौकीलगत महाकाय दरड कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडल्याने वाहतुक ठप्प राहिली.
पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ हे ब्रिटीशकालीन हिलस्टेशन कुडपणच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. साधारणपणे २००-२५० लोकवस्तीच्या गावाची श्रध्दा क्षेत्रपाल म्हणजे श्री काळभैरवनाथांवर आहे. मध्यभागी श्री काळभैरवनाथां मंदिर असलेल्या या गावाच्या गावठाणाबाहेर रविवारी रात्री मोठी दरड कोसळली आणि क्षेत्रपाळाने गावासह गावात असलेल्या 80-90गावकऱ्यांना सुरक्षित ठेवले. या घटनेची खबर पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना देण्यात आली आहे. मात्र, कोणतीही इजा दुखापत अथवा मालमत्तेची हानी झाली नसल्याने क्षेत्रपाळ गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचे तहसीलदार घोरपडे यांनी सांगितले. क्षेत्रपाल गावाच्या लोकवस्तीपासून काही फुटांच्या अंतरावरून लालमाती व दरडीचा ढिगारा कोसळून सुध्दा सर्व घरे व ग्रामस्थ सुरक्षित राहिल्याची दृश्यं दैवी शक्तीची प्रचिती मानली जात आहे.
पोलादपूर शहरातील गंगामाता मंदिर घाट, राममंदिर घाट, गणेशमंदिर घाट, गणपती विसर्जन घाट आणि स्मशानभूमीचा घाट पुरात बुडवून उत्तरवाहिनी सावित्री नदी खळाळत जुना महाबळेश्वर रस्त्यावरून वाहू लागली. मध्यरात्री नगरपंचायत पोलादपूरकडून सायरन भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ढवळी नदीच्या पात्राने पुलावरून प्रवाह नेताना पुलाचा कठडा तुटल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रात्री कामथी नदीच्या पात्रानेही मोरसडे गावालगत धोक्याची पातळी ओलांडली. कापडे ते कामथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावर काही ठिकाणी काही काळ पूरस्थिती दिसून आली.
दरम्यान, कशेडी घाटातील भुयारी मार्गापलिकडेदेखील कशेडी टॅप पोलीस चौकीलगत मुंबई आणि गोवा या दोन्ही मार्गांवर महाकाय दरड कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडल्याने तब्बल 12 तासांनंतर एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील वाहतुक ठप्प राहिली. चार दिवस वाहतूक बंदी घालण्यात आलेल्या आंबेनळी घाटातील रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटनांचे सातत्य कायम राहिले आहे.
पोलादपूर रानबाजिरे धरणातील पाण्याची धोक्याची इशारा पातळी 57.40 मीटर झाल्याचे रविवारी सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापत्य विभाग कार्यकारी अभियंतातर्फे जाहीर करण्यात येऊन सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. गेल्या बुधवारी 108 मि.मी.पासून पावसाने सातत्य ठेवले असताना शनिवारी सकाळी 222मि.मी.नोंदीसह 888 मि.मी. सरासरी, रविवारी सकाळी 111 मि.मी. नोंदीसह 999 मि.मी. सरासरी तर सोमवारी सकाळी 265 मि.मी. नोंदीसह 1264 मि.मी. सरासरी पावसाची नोंद आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त झाली.
सोमवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रानबाजिरे धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी ओसरण्यास काही तास उशीर झाला. परिणामी, तालुक्यातील माटवण रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी कमी होण्यास अडथळा होऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद राहिला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यावर जनजीवन सुरळीत आणण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांनी गती प्राप्त केली. कुडपण येथे रस्त्यावर दरडी आल्याने रस्ता खचला. परिणामी, सकाळी एसटी बस पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.