महाड व पोलादपूरला येणाऱ्या दरवर्षी पुराचा सामना करण्यासाठी दोन तालुक्यातील सावित्री, गांधारी ,काळ यासह अनेक छोट्या मोठ्या उपनद्यांमधूनगाळ काढल्यानंतर पूर मुक्त महाडची आशा असतानाच महाड शहराला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गात एकच धावपळ उडाली. तालुक्यातील सावित्री, गांधारी, आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसरात पुराचे पाणीच पाणी झाले. महाड शहरातील बाजारपेठेंसह सर्व रस्त्यांवर साचले होते यामुळे अनेक मार्ग देखील बंद राहिले आहेत.
सोमवारी सकाळी ओसरत जाणारे पाणी पुन्हा चढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.
महाड शहर आणि तालुका पुराच्या बाबतीत कायम संवेदनशील राहिला आहे. गेली दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच महाबळेश्वर मध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसाचा परिणाम महाड शहराला कायम बसत आला आहे. येथील रान बाजीरे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक मार्ग बंद असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी रात्री महाड शहरात धोक्याचा इशारा देण्यात आला आणि बघता बघता महाड शहरात पाणी शिरले. यामुळे बाजारपेठेतील दुकानांतून पाणी शिरल्याने व्यापारी हवालदिल झाले.
तालुक्यात ६ जुलै रोजीसरासरी २६० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर मध्ये ५ जुलै रोजी११३.९मिमी, ६ जुलै रोजी९८.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सात जुलैला ४३.०० मिलिमीटर तर,८ जुलैला५८.३ मिलिमीटर व नऊ जुलैला २२.२ मिलिमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे महाड तालुक्यातील खाडी पट्टा, वाळण, आणि बिरवाडी भागात देखील कमी अधिक प्रमाणात पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला आहे. शहराजवळील दादली आणि गांधारी पुलावरून देखील पुराचे पाणी जाऊ लागल्याने हे मार्ग रविवारी रात्री पासूनच बंद ठेवण्यात आले. याठिकाणी स्थानिक आपदा मित्र आणि शासकीय कर्मचारी तैनात केले असले तरी पूर पाहण्यास आलेल्या नागरिकांना आवरणे या कर्मचाऱ्यांना अवघड होत होते.
गाळ काढल्याने स्थानिक प्रशासन देखील पूर न येण्याच्या आनंदात मग्न होते मात्र अचानक आलेल्या या पुरामुळे प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. तालुक्यातील पूर परिस्थितीवर एन.डी.आर.एफ. नजर ठेवून असून स्थानिक आपदा नियंत्रण केंद्र मात्र सुस्त असल्याचे दिसून आले. शहरात अद्याप कुठेच आपत्ती निवारण यंत्रणा काम करताना आढळली नाही. तालुका उपविभागीय अधिकारी देखील सुस्त असल्याने पुराच्या पाण्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसला असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. यापूर्वी ज्या पद्धतीने आपत्ती निवारण यंत्रणेचे काम दिसून यायचे त्या प्रमाणे यावेळी मात्र सुस्त पणा असल्याने नागरिकांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
साहिलनगर भागात घर कोसळून तिघे जन जखमी
दरम्यान या मुसळधार पावसात साहिलनगर भागातील एक घर रविवारी रात्री कोसळले. घर कोसळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेवून बचाव कार्यात मदत केली. यास्मिन मुबीन फटकुरे यांच्या मालकीचे हे घर असून यामध्ये यास्मिन मुबीन फटकुरे आणि मुबीन फटकुरे हे जखमी झाले आहेत. यांचे घर कोसळताना शेजारील घरे देखील सापडली. यामध्ये हसन अब्बास शेख, नजीर अब्बास शेख, यांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे. यामध्ये मुमताज हसन शेख या जखमी झाल्या आहेत. या घटनेत हे किरकोळ जखमी झाले असले तरी या परिसरातील बहुतांश घरे हि टेकडीवर वसली असल्याने प्रशासनाने येथील नागरिकांना देखील यापूर्वीच नोटीसा बजावल्या आहेत.
पुराच्या पाण्यात एस.टी. सापडली – प्रवासी सुखरूप
महाड जवळ केंबूर्ली गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर साचलेल्या पाण्यातून वाट काढणारी एस.टी.बस अडकल्याची घटना घडली. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी आणि चुकीच्या पद्धतीने केली असल्याने महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचून राहत आहे. रविवारी मुंबई वरून महाडकडे येणारी एक एस.टी.बस केंबूर्ली गावाजवळ आली असता समोरील वाहने साचलेल्या पाण्यातून मार्गस्थ होत असल्याने चालकाने बस त्यांच्या मागून काढण्यास सुरवात केली मात्र मध्यात येताच बस पाण्याच्या प्रवाहा बरोबर आलेल्या दगडात अडकून पडली. या बसमधून जवळपास १५ प्रवासी प्रवास करत होते. बस अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी धाव घेवून बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
एस.टी.चे वेळापत्रक कोलमडले
धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे महाड एस.टी स्थानकाचे देखील वेळापत्रक कोलमडले आहे. तालुक्यातील बहुतांश रस्ते बंद असल्याने महाड आगारातून सुटणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. पोलादपूर मध्ये जाणाऱ्या केवळ चारच बस सुरु ठेवण्यात आल्या असून बाकीच्या जवळपास ३४९ बसेस रद्द केल्या असल्याची माहिती महाड आगार प्रमुख रितेश फुलपगार यांनी दिली.