रायगड जिल्ह्यातील माणगांव येथील वडघर येथे असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्र आणि ‘आयआयटी बाँम्बे’ यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी, ऊर्जा इत्यादी मूलभूत क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान लक्ष केंद्रित मार्गदर्शक प्रकल्पाला समाजाभिमुख करण्यासाठी ‘लिव्हिंग लॅब’चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष प्रमोद निगुडकर, जैवविविधता संवर्धन आणि संशोधन केंद्र अध्यक्ष संजय मंगला गोपाळ, जवाहर नागोरी, विष्णू प्रभुदेसाई, सुरेखा दळवी, आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य बोराळे, अल्लाउद्दीन शेख, रवी देसाई, दीपक क्षीरसागर, केतन मजदेकर तसेच टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सोल्यूशन्स सेलचे उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष ‘आयआयटी बाँम्बे’चे प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई, शेप फाऊंडेशनचे प्रसाद कुलकर्णी, सातारा रिन्यूएबल्सचे आनंद टेंबे तसेच विश्वस्त सिरत सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास आयआयटी बाँम्बेच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सोल्यूशन्स सेल आणि उन्नत महाराष्ट्र अभियान कक्षाचे प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई यांनी अन्य तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांसह उपस्थित राहून विद्यार्थी तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैज्ञानिक उपक्रम विद्यार्थी व सहलींद्वारे समाजापर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा अधोरेखित केली. पहिल्या टप्प्यामध्ये 4 किलोवॅट सोलर नेट मीटरिंग (ग्रिड-कनेक्टेड) प्रणालीची कार्यपध्दती विषद करून सातारा रिन्यूएबल्सचे आनंद टेंबे यांनी सोलार शाश्वत ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोताबाबत मार्गदर्शन केले. पाणी बचतीसाठी हँड वॉश स्टेशन तसेच वीज न लागणारी गुरुत्वाकर्षण आधारित पिण्याच्या पाण्याची अल्ट्राफिल्ट्रेशन यंत्रणा यांची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यापूर्वी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सोल्यूशन्स सेलचे उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष ‘आयआयटी बाँम्बे’चे प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई यांनी सादरीकरण करताना शाश्वत विकास, शाश्वत ऊर्जा व प्रगत तंत्रज्ञान यांची सांगड घालणाऱ्या ‘प्रोजेक्ट आऊटरिच’ या प्रकल्पाची संकल्पना व उद्दिष्ट या विषयावर मुद्देसूद माहिती दिली.
शेप फाऊंडेशनचे प्रसाद कुलकर्णी यांनी वीज न लागणारा भाजी व फळे साठवण्यासाठी सब्जी कूलर याबाबत माहिती पुरवून पर्यावरणपूरकता तसेच ऊर्जा व पाण्याची बचत करण्यासंदर्भात समाजजागृतीचे आवाहन केले. पिण्याच्या पाण्याची अल्ट्रा फिल्ट्रेशनपध्दतीबाबत प्रसाद कुलकर्णी यांनी आरओद्वारे पाण्याचा वापर केल्यास प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी होते. यामध्ये झिंक, तांबे, लोखंड तसेच अन्य क्षार नष्ट झाल्याने मृत पाण्याचा बाटलीबंद पाणी म्हणून वापर केला जात असल्याने हल्ली या खनिज व क्षारांचा समावेश पिण्याच्या पाण्यामध्ये जाणीवपूर्वक केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरओ च्या वापराबाबत आक्षेप घेतले असून ग्रामीण भारतातील पाणी पिण्यायोग्य असल्याने बंदीसदृश्य कठोर भूमिका घेतल्याचे यावेळी सांगितले.
याप्रसंगी गोरेगाव येथील ना.म.जोशी विद्याभवनचे तसेच ए.के.आय ऊर्दू हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त सिरत सातपुते यांनी केले.