कोलाड | श्याम लोखंडे
पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व समजला जाणारा तसेच महाभारताशी जोडला गेलेला सारीपाट खेळाचा डाव आजही ग्रामीण भागात विशेषतः सार्व. उत्सव काळात खेळला जात आहे. आधुनिक काळात गणपती उत्सवातील अनेक पारंपारीक खेळ इंटरनेट मोबाईल युट्यूब इंस्टाग्रामध्ये लोप पावत असतांना दिसत आहेत. परंतु रोहा तालुक्यातील तसेच कुणबी समाज नेते माजी आमदार कै.पा.रा. सानप. यांच्या संभे गावात आजही या पारंपरिक खेळाची परंपरा पिढ्यानं पिढ्यापासून सुरु असणारा सारिपाटचा खेळ अजून ही टिकून ठेवला असल्याचे सार्व.उत्सव काळात दिसून येत आहे. हा खेळ गणेश उत्सवापासून नवरात्रौउत्सव दसऱ्या पर्यंत खेळाला जात असून कोजागिरी पौर्णिमेला या खेळाची समाप्ती केली जाते. त्यामुळे या गावातील तरुण पिढी देखील आकर्षित होत असून तिसरी पिढी देखील हा खेळ वयोवृद्ध ज्येष्ठांसोबत खेळत ही परंपरा टिकवून ठेवली आहे.
पौराणिक कथेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती हा खेळ आवडीने खेळत असत. तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे देव खंडोबा आणि देवी म्हाळसा यांच्यातही सारीपाट रंगत असल्याचे दाखले मिळतात. तसेच इतिहासकाळात राजे, सरदार, पाटील आणि देशमुख मंडळी हा खेळ मोठ्या आवडीने खेळत असत.मात्र खंडोबा व म्हाळसाकांत यांच्यात ही सारिपाटचा खेळ खेळला जात असल्याचे दर्शन “जय मल्हार,या मालिकेतून साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आणि अशी ही या खेळाची परंपरा आज ही ग्रामीण भागात टिकून आहे आणि ती आवडीने जोपासली जात असल्याचे संभे गावातून दिसून येते आहे.
या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असुन सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्याचा वापर केला जात आहे. लाकडी सोंगट्या पटावर घेऊन हा खेळ सुरु होतो.तर फासे म्हणून कवड्यांचे दान घेतले जातो. हा खेळ दोन गटात खेळला जात असुन दोन्ही संघाकडे एकूण १६ (प्रत्यकी ८) सोंगट्या असतात. या खेळात १० किंवा २५ दान पडल्याशिवाय हा खेळ सुरु होत नाही.या खेळात दहा, पंचिवीस, दोन,तीन,चार, सहा, अशी दाने पडतात. तर सारिपटावर असणाऱ्या (x) चौकटीत ‘चिरा’ म्हणतात येथे असणारी सोंगटी सुरक्षित असते. तीला मारता येत नाही.ज्या गटाच्या सोंगट्या मध्यस्ती जातील तो गट विजयी होतो. तर एका गटाने सोंगटी मारल्यानंतर दुसऱ्या विरोधी गटाने सोंगटी मारल्या नंतर खेळ बरोबरीत सुटतो.
सारिपटाचा एक डाव पूर्ण होण्यासाठी तीन ते चार तास लागतात पूर्ण जागरण होण्यासाठी दोन ते तीन डाव होतात. विशेष म्हणजे या खेळात पैशाचा वापर केला जात नाही.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ जागरण म्हणून खेळला जातो.ही या खेळाची परंपरा संभे गावातील नागरिकांनी जपली असून रोहा तालुक्यातील गोवे संभे सह काही विशेष गावात येथे हा खेळ खेळला जात आहे.
———————————-
राजे महाराजांचा विरंगुळा इतिहासकाळात राजे, सरदार,पाटील आणि देशमुख मंडळी हा खेळ मोठ्या आवडीने खेळत होते. आजच्या इंटरनेट डिजिटल युगात आणि मोबाईल गेम्सच्या प्रभावामुळे हा पारंपरिक खेळ हळूहळू लोप पावत चालला आहे. मात्र, तालुक्यातील संभे आणि गोवे या गावात विशेषतः गणेशोत्सव तसेच नवरात्रो उत्सव सार्व. उत्सव काळात जागरणाचा भाग म्हणून जुनी-जाणती मंडळी हा खेळ आजही मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात खेळतात त्याचा अनुकरण येथील तरुण पिढीने जोपासत ही परंपरा टिकवून ठेवली आहे.
