येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५१ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो शिवभक्त दाखल होत असतात. या शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी रायगडावर प्रशासनामार्फत जय्यत तयारी केली गेली आहे.
किल्ले रायगड आणि परिसरामध्ये सुमारे २००० पोलिसांसह सातशे कर्मचारी तैनात राहणार आहेत. किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून गेली काही वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. वर्षानुवर्षी या सोहळ्याकरता शिवभक्तांची गर्दी वाढतच चालली आहे. यामुळे गडावर आणि परिसरामध्ये प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेली काही दिवस प्रशासनामार्फत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत.
पोलीस दलाची विविध पथके तैनात
यावर्षी देखील लाखो शिवभक्त गडावर दाखल होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे प्रशासनामार्फत जय्यत तयारी सुरू केली गेली आहे. या सोहळ्यासाठी २००० पोलीस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत, तर ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवक या ठिकाणी काम करणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह अन्य दोन पोलीस उपाधीक्षक, ११ पोलीस उपविभागीय अधीकारी, २८ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस उपजिल्हाध्यक्ष, ९०० पोलीस कर्मचारी १३५ वाहतूक पोलीस तसेच पोलीस दलाची विविध पथके या ठिकाणी दाखल होणार आहेत.
शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा
किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याकरिता गडावरील विविध ठिकाणी असलेल्या तलावातील पाणी एकत्रित केले आहे. त्याचप्रमाणे गडावर पिण्याच्या पाण्याची असुविधा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पाण्याच्या टँकरचे देखील नियोजन करण्यात आले आहे.
पायरी मार्गावर वैद्यकीय पथके आणि कर्मचारी नियुक्त
रायगडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या वाहनांची पार्किंग करण्यासाठी प्रशासनाकडून कोंझर आणि पाचाड येथे सुविधा केलेली आहे. या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहने पार्क करून तेथून एसटीने रायगड कडे सोडण्यात येणार आहे. महाड एसटी आगाराकडून याकरिता एसटी बसेस मागवण्यात आलेले आहेत. आरोग्य विभागाचे पथके देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा येथून पायी चालत जाणाऱ्या शिवभक्तांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या सुविधेसाठी गडावर आणि पायरी मार्गावर वैद्यकीय पथके आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
शौचालय व मुताऱ्यांची दुरावस्था
रायगड रोपवे देखील शिवभक्तांकरता दिवस रात्र सुरू राहणार आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व महसूल विभागाकडून खर्च करण्यात आलेल्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ झाला होता अनेक कामे न करता व बोगस पद्धतीने व ज्यादा संख्येने दाखवून करोडो रुपये हडप करण्याचे काम ज्या पद्धतीने झाले त्याच पद्धतीने चालू वर्षी देखील करोडो रुपये हडप करण्याचे उद्योग प्रशासनाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया रायगड दर्शनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांकडून व शिवभक्तांकडून ऐकण्यास मिळाल्या शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात शौचालयांची व मुताऱ्यांची व्यवस्था केली जाते मात्र त्यांच्या देखभालीकडे दुरावस्था असल्याने अनेक लाखो पर्यटक व शिवभक्त उघड्यावरच आपला विधी उरकून मोकळे होत असल्याचे चित्र नेहमीप्रमाणे यावर्षी देखील रायगडावर पाहण्यास मिळणार आहे.