कर्जतच्या शाळकरी मुलींच्या धाडसाची राज ठाकरेंकडून दखल

शाळकरी मुलींच्या धाडसाची राज ठाकरेंकडून दखल
कर्जत | गणेश पवार
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील रस्त्यांची दुरवस्था मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून प्रशासनाचे लक्ष वेधणाऱ्या शाळकरी मुलींच्या धाडसाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे. नेहा घारे, जोश्ना मुखणे आणि मानसी पवार या विद्यार्थिनींनी रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, चिखल आणि नागरिकांची होणारी गैरसोय याचे थेट ग्राउंड रिपोर्टिंग केले होते. या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर प्रशासनाचेही रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधले गेले. या पार्श्वभूमीवर तिन्ही मुलींनी शिवतीर्थ येथील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी राज ठाकरे यांनी मुलींशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या धाडसाचे आणि सामाजिक जाणीवेचे मनापासून कौतुक केले. “तुमच्यामुळे आज सरकारला जाग आली,” असे सांगत त्यांनी लहान वयात गावातील मूलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवण्याच्या त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. प्रश्न मांडण्याची त्यांची पद्धत कौतुकास्पद असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी तिन्ही विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोंदिवडे परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास मुलींनी मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला होता. त्यांच्या या धाडसी ग्राउंड रिपोर्टिंगमुळे रस्त्याचा प्रश्न चर्चेत आला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. शाळकरी मुलींनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि जनहितासाठी आवाज उठवण्याची वृत्ती परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.
यावेळी शर्मिला ठाकरे आणि मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनीही नेहा घारे, जोश्ना मुखणे आणि मानसी पवार यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या पालकांचेही कौतुक केले. मुलींनी केलेली रस्त्यांची पोलखोल, त्यानंतर प्रशासनाने या प्रश्नाकडे दिलेले लक्ष आणि या उपक्रमातून निर्माण झालेली सामाजिक जागृती याबाबतही चर्चा करण्यात आली.
या भेटीवेळी मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत वन्सोडे, मनसे रेल्वे सेना अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे कर्जत तालुका उपाध्यक्ष भूषण राणे आणि मनसे विद्यार्थी सेना विभागाध्यक्ष कर्जत यश महागांवकर उपस्थित होते.
दरम्यान, भेटीनंतर पत्रकारांनी या शाळकरी मुलींशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्या भविष्यातील स्वप्नांबद्दलही सांगितले. नेहा घारे हिने शिक्षण पूर्ण करून स्टेनोग्राफर होण्याची, जोश्ना मुखणे हिने स्केच आर्टिस्ट बनण्याची, तर मानसी पवार हिने उत्तम युट्यूबर होण्याची इच्छा व्यक्त केली. गावातील मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवतानाच आपल्या भविष्यातील ध्येयांचीही स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या या मुलींच्या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून गावाचा प्रश्न मांडणाऱ्या या शाळकरी मुलींनी प्रशासनालाच आरसा दाखवला असून, त्यांच्या धाडसी पत्रकारितेमुळे कोंदिवडेच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.