शंकर मयेकर आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

शंकर मयेकर आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
बोर्ली पंचतन | मकरंद जाधव
रायगड जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर रोजी क्षत्रीय समाज सभागृह कुरूळ अलिबाग येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचं रहाणीमान उंचावण्यास मदत करणाऱ्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामसेवकांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावचे सुपुत्र व सध्या याच ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असणारे ग्रामसेवक शंकर मयेकर यांना सन २०१७/१८-दांडगुरी व २०२१/२२- वांजळे या ग्रामपंचायतीच्या सेवा काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आलं. शंकर मयेकर यांनी आजपर्यंत श्रीवर्धन तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असताना तेथील सरपंच,सदस्य व लोकसहभागाच्या माध्यमातून गावासाठी विविध योजना राबविताना त्या ग्रामपंचायतींना विविध पुरस्कार मिळवून दिले.‌
ग्रामस्थांच्या सहकार्याने विधवा प्रथा बंदीचा धाडसी ठराव करणारी जिल्ह्यातील पहीली ग्रामपंचायत खुजारे तर तालुक्यातील पहीली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत दिवेआगर असे सन्मान प्राप्त करुन देण्यात ग्रामसेवक शंकर मयेकर यांचं मोलाच योगदान आहे. म्हसळा तालुक्यातील वारळ ग्रामपंचायतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुद्धा सन २०११/१२ साठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार म्हणून मयेकर यांची निवड झाल्याने त्यांच्या सेवा काळात त्यांना तिसऱ्यांदा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा बहुमान प्राप्त झाला आहे.
पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना शुभेच्छा देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की गावाच्या समस्या सोडविणारा खरा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत आणि त्याचे शिल्पकार म्हणजे ग्रामसेवक. मोठ्या लोकसंख्येच्या गावात ग्रामसेवकाचे काम अधिक आव्हानात्मक असते त्यामुळे आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव होणे ही जबाबदारी अधिक वाढविणारी बाब आहे. यावेळी आमदार महेंद्र दळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. शंकर मयेकर यांना मिळालेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारामुळे त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
—————————————
मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सेवेत आल्यापासून प्रामाणिकपणे केलेल्या आजवरच्या कामाची पावती असून या यशस्वी वाटचालीत गावातील नागरीक,ग्रामपंचायत कर्मचारी,वरिष्ठ अधिकारी, अनेक सहकारी,कुटुंब,पत्रकार आणि मित्रपरिवाराचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं.
… शंकर मयेकर, ग्रामसेवक
 गृप ‌ग्रामपंचायत बोर्लीपंचतन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *