अलिबाग तालुक्यातील मांडवी मोहल्ला येथे वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्यावर हल्ला झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. “बिल भरा” असे सांगताच ग्राहकांकडून आक्रमक प्रतिक्रिया देत मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
२५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वैष्णवी तेजस दांडेकर (वय ३३), सहाय्यक अभियंता, महावितरण अलिबाग या आपल्या कर्मचाऱ्यांसह मांडवी मोहल्ला येथे थकबाकी वसुलीसाठी गेल्या होत्या. संबंधितांकडे वीज बिल थकीत असल्याने नियमानुसार वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या वेळी वाद निर्माण होऊन परिस्थिती चिघळली.
आरोपी मुसददीक जैनुददीक चौधरी (वय ४२) आणि अरफान मुनवर चौधरी (वय २२), दोघेही मांडवी मोहल्ला येथील रहिवासी, यांनी सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या महिला अधिकाऱ्यांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांना अडवून धाक दाखवला. त्यानंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण व धमकी देणे या गंभीर गुन्ह्यांखाली आरोपींवर खटला दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष भुंडेरे करत आहेत. दरम्यान, “कर्तव्य बजावताना सुरक्षितता कुठे?” असा सवाल आता उपस्थित होत असून, सरकारी कर्मचाऱ्यांना काम करताना योग्य संरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाईची मागणी केली आहे.