वि. गो. लिमये विद्यामंदिर दिवेआगरचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Diveagar vidyalay
वेळास आगर | संतोष शिलकर
श्रीवर्धन तालुक्यातील पंचतन शिक्षण संस्थेच्या विनायक गोपाळ लिमये विद्यामंदिर दिवेआगर विद्यालयाचा ६९ वा वर्धापन दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२५) आनंदोत्साहात पार पडला. श्री सत्यनारायण पूजन महेंद्र हातिसकर यांच्या हस्ते पार पडले. पंचतन शिक्षण संस्था अध्यक्ष विजय सुदाम तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दिपप्रज्वलन, गणेशपूजन, सरस्वतीपूजन व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची गरज अधोरेखित करत संस्थेच्या कामाचे विशेष कौतुक केले. तर उद्घाटनेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गोरगरिबांचे दाता, रोजगार हमी, खारभूमी विकास व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत शाळेसाठी नवीन इमारत उभारून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २१ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींसह विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष विजय तोडणकर यांनी संस्थेच्या इतिहासाचा आढावा घेत गोठ्यातून सुरू झालेली शाळा आज वटवृक्षासारखी फुलत असल्याचे सांगितले. सत्यनारायण पूजाविधीचे मानकरी श्री व सौ. रुणाली महेंद्र हातिसकर यांनी विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ₹५०,००० वॉटर प्युरिफायरसाठी देणगी दिली. रांगोळी-हस्तकला प्रदर्शन, विविध नृत्य सादरीकरणे, सत्कार कार्यक्रम व रात्रीच्या गॅदरिंगमुळे सोहळा रंगतदार झाला. विद्यार्थ्यांच्या कौशल्याने चमकलेल्या या कार्यक्रमाची गोड सांगता होताच वि. गो. लिमये विद्यामंदिर गौरवशाली ७० व्या वर्षात पदार्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *