पेण शहरातील म्हाडा कॉलनी येथील विश्वरूप रुग्णालयामार्फत आयोजित मोफत आरोग्य शिबिराला रुग्णांनी उदंड प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह , हाडांचे विकार, त्वचारोग, हृदयाचे आजार, मणक्याचे आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, जनरल सर्जन व तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ सुमारे 250 रुग्णांनी घेतला. यावेळी 3 ते 4 हजार रुपये खर्च येणाऱ्या विविध रक्ताच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. यामध्ये ब्लड शुगर, एच बी ए 1 सी, बी एम आय, लिपीड प्रोफाइल, यूरिक ॲसिड, थायरॉईड आदींसह ईसीजी व इतर चाचण्या मोफत करण्यात आल्या.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, तसेच व्यसनांपासून दूर राहून चांगले आरोग्य राखण्याचे आवाहन यावेळी डॉक्टर विवेकानंद सिंग यांनी केले. तसेच ज्या रुग्णांना लाइफस्टाइल निगडित डायबिटीस, बिपी व इतर आजार आहेत त्यांनी वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वेळेवर औषध उपचार घेण्याचा सल्ला यावेळी डॉक्टर सिंग यांनी दिला.
डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. अपेक्षा पाटील, डॉ. आदित्य घरत, डॉ. आरती रसाळ यांच्यासह यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांच्या आरोग्याची तपासणी व रोगनिदान केले. या शिबिराकरीता भूषण म्हात्रे, अमित म्हात्रे, विश्वरूप रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.