
उरण | विठ्ठल ममताबादे
भोंदूगिरी करणाऱ्यांसह त्यांना पाठबळ देणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले, अशी माहिती कामगार नेते भूषण पाटील यांनी दिली. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे, रविंद्र कासुकर, पद्माकर पाटील, कुंदा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोंदू बाबा अशोक खरात याच्या तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ३९ आमदार सामील असल्याची चर्चा समोर येत असून संबंधितांची नावे जाहीर करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
राज्यात वाढत्या भोंदूगिरीविरोधात विशेष मोहीम राबवावी, जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या सोशल मीडिया जाहिरातींवर बंदी आणावी तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. राज्यभर झालेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
Related