विद्यार्थिनींसोबत पालकांनाही शिस्तीचे धडे

कर्जत | प्रतिनिधी 
विद्यार्थिनींची शिस्त, सुरक्षितता आणि शैक्षणिक प्रगती ही केवळ शाळेचीच जबाबदारी नसून, त्यासाठी पालकांचे सहकार्य आणि जबाबदार वर्तनही तितकेच महत्त्वाचे आहे. शाळेतील नियमांचे पालन, विद्यार्थिनींची नियमित उपस्थिती आणि त्यांच्या शिक्षणाबाबत पालकांनी अधिक जागरूक राहावे, यासाठी कर्जत तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत पालक-शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार, दि. २२ जुलै रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थिनींचे सुमारे १२५ पालक उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि शिस्त अबाधित ठेवण्यासाठी पालकांनीही शाळेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
शालेय आवारात विद्यार्थिनींच्या आई-वडिलांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पालकांनी ठरलेल्या दिवशीच आपल्या पाल्यांना भेटावे तसेच वर्गशिक्षक व विषय शिक्षकांची भेट घेऊन विद्यार्थिनींच्या अभ्यासाची प्रगती, उपस्थिती आणि इतर बाबींबाबत संवाद साधावा, अशा सूचना देण्यात आल्या. पालकांनी आपल्या पाल्याव्यतिरिक्त इतर विद्यार्थिनींना सोबत घेऊन बसू नये किंवा त्यांना मोबाईल देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थिनींची भेट घेतल्यानंतर त्यांना गेटपर्यंत सोडून पालकांनी शाळेच्या परिसरात अनावश्यकपणे थांबू नये. तसेच काही पुरुष पालक वसतिगृहातील आपल्या मुलींच्या खोलीपर्यंत जात असल्याचे निदर्शनास आल्याने, ही बाब पूर्णपणे थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांनी या नियमांचे गांभीर्याने पालन करावे, असे सांगण्यात आले.
सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही माहिती खरी आहे की नाही, याची खात्री शाळा प्रशासनाशी संपर्क साधून करावी. पालकांनी शाळेत भेटीस आल्यानंतर शालेय परिसराची पाहणी करून काही अडचण किंवा समस्या आढळल्यास ती प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून त्यावर चर्चा करून योग्य तोडगा काढता येईल, असेही आवाहन करण्यात आले.
विद्यार्थिनींना वारंवार घरी घेऊन जाण्याचे प्रमाण कमी करावे, शक्यतो ते बंदच करावे. अत्यावश्यक कारण असल्यास शनिवारी विद्यार्थिनींना घरी घेऊन जावे आणि सोमवारी सकाळी १० वाजण्यापूर्वी त्यांना पुन्हा शाळेत दाखल करावे, अशी सूचना करण्यात आली. विद्यार्थिनींची गैरहजेरी कमी करून १०० टक्के उपस्थिती कशी राहील, यासाठी पालक आणि शाळा प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थिनींची नियमित उपस्थिती राहिल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, यावरही यावेळी विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत ठोंबरे, पत्रकार मोतीराम पादीर यांच्यासह १२५ पुरुष व महिला पालक उपस्थित होते. शिक्षक व्ही. व्ही. मोरे, एस. पी. मोरे, जी. एस. पाटील, टी. एस. खामकर, अधीक्षक एस. पी. पाटील, एस. के. किरवे आणि मुख्याध्यापक एम. ए. पडघन यांनी पालकांशी समुपदेशनपर संवाद साधला.
यावेळी काही पालकांनी शाळेबाबत आपली मते व सूचना मांडल्या. शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये झालेल्या सकारात्मक संवादाबद्दल उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले. मेळाव्याच्या सांगतेनंतर पालक व विद्यार्थिनींनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पालकांनी वर्गात जाऊन वर्गशिक्षक व विषय शिक्षकांशी संवाद साधत आपल्या पाल्यांच्या अभ्यासाची प्रगती आणि इतर बाबींची माहिती घेतली.