झाडाची फांदी कारवर कोसळली; पनवेल महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पनवेल | प्रतिनिधी 
खारघर सेक्टर-13 येथे एन.के.जी.एस. बी बँकेजवळ 21 जुलै रोजी झाडाची मोठी फांदी उभ्या असलेल्या कारवर कोसळून वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेनंतर पनवेल महानगरपालिकेच्या धोकादायक झाडांच्या छाटणीबाबतच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या छाटणीसाठी लाखो रुपयांची कामे मंजूर झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्ते, वीजवाहिन्या आणि वाहनांवर धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र कायम आहे. या निष्काळजीपणामुळेच खारघरमध्ये कारवर फांदी कोसळल्याची घटना घडल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख नंदू वारुंगसे यांनी केला. यापूर्वी अनेकदा लेखी निवेदने देऊन प्रशासनाला इशारा दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून झाडांच्या छाटणीसाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच निष्काळजी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारुंगसे यांनी केली आहे. खारघरमधील सर्व धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून छाटणी करण्यात यावी आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे.