वाहतूक कोंडीने घेतला निष्पाप बाळाचा बळी! आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास

वाहतूक कोंडीने घेतला निष्पाप बाळाचा बळी! आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास
ठाणे : 
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १६ महिन्यांच्या चिमुकल्याला पुढील उपचारासाठी मुंबईकडे आणले जात होते. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकून राहिली. वेळेवर उपचार न मिळाल्याने या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला.
ठाणे-घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामासाठी तसेच ठाणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ठाण्याकडे येणारी अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेमुळे १६ महिन्यांच्या बाळाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
मन सुन्न करणाऱ्या या घटनेने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींवर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. नागरिकांनीही सोशल मीडियावरून या घटनेवर हळहळ व्यक्त केली असून जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *