वाघ्रण गावचा सुपुत्र ॲड. सन्मान प्रमोद पाटील यांनी ‘प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)’ (JMFC) परीक्षा उत्तीर्ण करत न्यायाधीशपदी झेप घेतली आहे. त्यांच्या या यशाबद्दल ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉमध्ये विशेष सन्मान सोहळा पार पडला.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते सन्मान पाटील आणि त्यांच्या आई-वडिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. “एका वकिलाचा मुलगा जिद्दीच्या जोरावर न्यायाधीश बनला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
सन्मान पाटील यांनी अलिबागमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून जे.एस.एम. कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर २०१७ मध्ये ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमधून एलएल.बी. पूर्ण केले. वडील ॲड. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली करत असतानाच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि हे यश मिळवले.
आपल्या मनोगतात त्यांनी सातत्य, संयम आणि आत्मविश्वास हे यशाचे मुख्य घटक असल्याचे सांगितले. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे कायद्याच्या संकल्पना स्पष्ट झाल्या तसेच मूट कोर्ट स्पर्धांमुळे व्यावहारिक ज्ञान वाढल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवावेत, असा संदेशही त्यांनी दिला.
प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी सन्मान पाटील हे महाविद्यालयातील पहिले न्यायाधीश असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ. साक्षी पाटील, डॉ. सोनाली पाटील, डॉ. प्रविण गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.