नागोठणे येथील एस.टी. बसस्थानकात ५ जून २०१९ रोजी घडलेल्या मारहाण प्रकरणात माणगाव न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत तीन आरोपींना दोषी ठरवले आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुकेश के. पाटील यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी हा निर्णय सुनावला.
या प्रकरणातील फिर्यादी दिपक जगाजी खंडागळे हे पेण आगारातील एस.टी. चालक असून, ते पेण-पाली मार्गावरील बस (एमएच ४० एन ८४०१) चालवत होते. नागोठणे बसस्थानकात प्रवेश करत असताना आरोपींनी त्यांच्या बससमोर मोटारसायकल उभी केली. वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपी आसिब इलामी, आदिल पानसरे आणि अरमान मन्सूरी यांनी चालकाला सीटवरून खाली खेचत त्याच्या शर्टाची बटणे तोडून बनियन फाडत मारहाण केली.
या घटनेप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एस.एस. करांडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सुनावणीदरम्यान अति. शासकीय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षींना न्यायालयाने महत्त्व दिले. त्यानुसार तिन्ही आरोपींना भा.द.वि. कलम ३५३ अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व दंड, कलम ३३२ व ३२३ अंतर्गत अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.