गोरेगाव व लोणेरे येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’मध्ये घडलेल्या धक्कादायक तरुणी प्रकरणामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला असून, घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरुवातीला आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र तो अजूनही मोकाट असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांची सभा आयोजित करण्यात आली. सभेत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेश आहिरे यांनी आक्रमक भूमिका घेत, “२४ तासांत आरोपीला अटक झाली नाही तर जिजामाता मैदानातून पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा दिला.
दरम्यान, पीडित तरुणीचे वडील प्रवीण मोरे, आई शुभांगी मोरे आणि काका मनोहर मोरे यांनी भावनिक प्रतिक्रिया देत आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात शिवसेना नेते अरुण चाळके यांनी गंभीर आरोप करत तपास राजकीय षडयंत्रातून भरकटवला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच माणगाव तालुका बौद्ध जन पंचायतचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनीही पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या घटनेमुळे गोरेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून आरोपीच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी होत आहे.