रोहा : राष्ट्रीय लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ९ लाख १९ हजारांची वसुली

Roha Lokadalat

सुकेळी ( दिनेश ठमके ) :

रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी प्रलंबित असलेल्या ७,९३२ खटल्यांपैकी ५,२४५ खटल्यांतून १५१ खटले तडजोडीने निकालात काढण्यात आले. यामधून ९ लाख १९ हजार, ५८५ रुपये एवढी रक्कम तडजोडीअंती जमा झाली. तसेच या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व वाद खटले म्हणजेच रोहा नगरपरिषद, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबी यांच्याकडील एकत्रित ४,८१७ प्रकरणे तडजोडीकरिता लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. त्यापैकी १०० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात येवून त्यामधून ९ लाख, ७ हजार, १८५ रुपये रक्कम वसूल करण्यात आली.
रोहा न्यायालयातील या लोक अदालतीमध्ये प्रकरणे ठेवून ती तडजोडीने मिटविण्याचे आवाहन पक्षकारांना करण्यात आले होते. त्यास पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने एकून १५१ प्रकरणे तडजोडीने निकाली काढून त्यामधून एकूण ९ लाख, १९ हजार, ५८५ रुपयांची वसुली झाल्याने रोहातील लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई., जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड यांच्या निर्देशानुसार रोहा तालुका विधी सेवा समिती मार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार दि. २७ जुलै रोजी करण्यात आले होते. या लोकअदालतीचे उद्घाटन रोहा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.एस.महाले यांच्या हस्ते व सह न्यायाधीश श्रिमती एम.सी. हासगे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
रोह्यातील या लोकन्यायालयात कक्षप्रमुख म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एस.एस.महाले साहेब यांनी काम पाहिले. तर यावेळी पंच म्हणून अॅड. विजया गोडबोले यांनी काम पाहिले. यावेळी रोहा नगरपरिषदेचे अधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबीचे प्रतिनिधी आदींसह पक्षकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी रोहा न्यायालयातील सर्व वकील वर्ग व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *