राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खासदारकीच्या निवडणुकीत जर काम केले नसते तर आमदार महेंद्र थोरवे यांना कर्जत मतदारसंघात तोंड दाखवायला पण जागा राहिली नसती : सुधाकर घारे

Sudhakar Ghare

खोपोली ( हनुमंत मोरे ) : 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खासदारकीच्या निवडणुकीत जर काम केले नसते तर तुम्हाला कर्जत मतदारसंघात तोंड दाखवायला पण जागा राहिली नसती असा टोला राष्ट्रवादीचे नेते, माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावला आहे. ते खालापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच “राष्ट्रवादी पक्षाने जर महायुतीचे काम केले नसते तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आघाडी राहिली असती का ? आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे बूथ तपासून बघा आम्ही आमच्या विभागात आघाडी घेतली आहे. पण तुम्ही ज्या जिल्हा परिषद वार्ड मध्ये राहता त्या जिल्हा परिषद वार्डमध्ये आपण साडेतीन हजारांच्या मतांनी मागे आहात असा आरोप देखील सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केला आहे.
शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी जर महायुतीचा धर्म पाळत नसेल तर आम्ही श्रीवर्धन मतदारसंघात आमचा उमेदवार उभा करू .” तर इतर कोणाचेही नाव घेण्यापेक्षा आ. महेंद्र थोरवे यांनी स्वतः श्रीवर्धन मतदारसंघात उमेदवारी लढवावी तेथे पालकमंत्री आदिती तटकरे खा. सुनील तटकरे आपली वाट पाहत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे कर्जत खालापूर मतदारसंघातील सक्षम पक्ष असून यामधील प्रत्येक जण विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यात निवडणूक जिंकण्याची शाश्वती राहिलेली नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवाय महायुतीचे काम जर तुम्हाला करायचे नसेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर पडा असे वारंवार बोलणारे आमदार महेंद्र थोरवे यांना आम्हाला महायुतीतून बाहेर पडा असे बोलण्याचा अधिकार कोणी दिला? महेंद्र थोरवे हे काय महाराष्ट्राच्या महायुतीचे अध्यक्ष आहेत का? असा घनाघाती टोला देखील सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावला आहे. त्याचप्रमाणे महायुतीतून बाहेर पडा असे सांगण्याचा अधिकार महेंद्र थोरवे यांना नाही तो अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठींना आहे.
आम्हाला आमच्या पक्षावर पूर्णपणे विश्वास आहे. आम्हाला आमच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल आणि आम्हाला ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊ,ती उमेदवारी लढवू आणि जिंकू सुद्धा असा आम्हाला विश्वास आहे.आमदार महेंद्र थोरवे हे आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कडेलोट करू, पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांना देखील अपशब्द वापरणे हे एखाद्या आमदारांना शोभण्यासारखे नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार महेंद्र थोरवे यांना नाही व त्यांनी यापुढे बोलण्याचा प्रयत्न करू नये.
आमदार महेंद्र थोरवे यांनी आमच्या वाटेला जाऊ नये, आम्हाला आमच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल असा आमच्या पक्षावर विश्वास आहे. पक्ष जो आम्हाला आदेश देईल त्याचे पालन सुद्धा आम्ही करणार आहोत; परंतु आ. महेंद्र थोरवे यांनी असे वारंवार टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिला आहे.
तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी श्रीवर्धन मध्ये जाऊन आपला उमेदवार घोषित करा याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही परंतु झालेल्या निवडणुकीत खासदार बारणे यांना मतदानाचा लीड सुधाकर घारे यांच्या जिल्हा परिषद वार्डात आहे तो लीड आमदार महेंद्र थोरवे यांच्या जिल्हा परिषद वार्डात नाही मग खऱ्या अर्थाने महायुतीचे काम कोणी केले ? तसेच खासदार बारणे यांना पाडण्याचे काम कोण करत होते हे विद्यमान आमदारांनी शोधून काढावं असा घणाघाती आरोप कर्जत खालापूर विधानसभेच्या महिला अध्यक्ष सुरेखा खेडकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केला आहे. तसेच आमदार थोरवे हे जर पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्यावर सतत टीका करण्याचे काम करत असतील तर ते सर्वसामान्य महिलांचा आदर काय करतील ? शिवाय आमदारांनी केलेली कामे ही जनतेच्या हिताची नसून स्वतःच्या हिताची केली आहेत असा टोला देखील त्यांनी आ. थोरवे यांना लगावला आहे.
 “गेल्या पाच वर्षात जो विकास झाला पाहिजे होता तो झाला नाही आणि त्यासाठी सक्षम नेतृत्व पाहिजे व त्यासाठी सुधाकर घारे यांना जनतेची मागणी आहे. महिला, तरुण वर्ग, कामगार खालापूर मध्ये रस्ते, वीज कामगार, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत व या समस्यांचा मार्ग कोणाकडे काढायचा असेल तर जनतेला सुधाकर घारेंच्या नावाने एक आशेचा किरण दिसत आहे. ‘राष्ट्रवादी पक्ष’ हा शरद पवारांचा पक्ष नसून तो अजित पवारांचा पक्ष आहे. आमचा पक्ष वेगळा आहे आणि आमच्या पक्ष वाढीसाठी आम्ही गाव भेट घेत आहोत, त्यासाठी आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही.
लोकसभेला आम्ही महायुतीला आघाडी मिळवून देण्याचे काम केले आहे व आता आम्ही विधानसभेची तयारी करीत आहोत. आमचा पक्ष आम्हाला जो आदेश देईल त्याचप्रमाणे आम्ही पक्षाचे काम करू पण राष्ट्रवादी पक्ष म्हणून व आमचा नेता म्हणून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खालापुरात काम करत आहोत आणि करत राहू आम्हाला कोणीही थांबू शकत नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *