रेवदंडा किनाऱ्यावर पर्यटकांची बिनधास्त धुमश्चक्री; स्थानिक त्रस्त, कडक कारवाईची मागणी

रेवदंडा किनाऱ्यावर पर्यटकांची बिनधास्त धुमश्चक्री; स्थानिक त्रस्त, कडक कारवाईची मागणी
रेवदंडा :
कोकणातील आकर्षक आणि ऐतिहासिक रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटकांची मनमानी सुरू असून स्थानिक नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत आहे. दर वीकेंडला आणि सुट्टीच्या दिवशी दहा–पंधरा चारचाकी वाहने थेट वाळूत आणली जातात, ज्यामुळे किनाऱ्यावरील वाळू उकरली जात असून नैसर्गिक सौंदर्याला धोका निर्माण झाला आहे. याआधी अनेकदा महागड्या गाड्या वाळूत रुतल्याच्या घटना घडल्या असून, काहींना दंडही झाला आहे. मात्र पर्यटकांच्या बेफिकिरीवर आजवर कोणताही प्रभावी अंकुश लागलेला नाही.
केवळ गाड्या उभ्या करण्यापुरतेच प्रकार मर्यादित नाहीत. विनापरवाना प्री-वेडिंग शूट, गाण्यांचे चित्रीकरण, ड्रोन उडवून एरियल शॉट्स घेणे अशा अनेक बेकायदेशीर क्रियाकलापांचा सुळसुळाट झाला आहे. हे सर्व परवानगीशिवाय होत असल्याने सुरक्षेचा धोका वाढत आहे. काही वेळा स्थानिकांशी वाद, दादागिरीचे प्रकारदेखील समोर येत आहेत. सुसाट धावणाऱ्या गाड्यांमुळे मोठ्या अपघाताची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. गाड्यांवर बंदी, विनापरवाना शूटिंगला आळा आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त या तिन्ही उपाययोजना तातडीने राबविण्याची स्थानिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *