रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे. ‘राजिप शिक्षण प्राथमिक’ या नावाने विकसित करण्यात आलेल्या डिजिटल ॲपचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाच क्लिकवर पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक स्तरावर आधारित अध्ययन-अध्यापन, खेळ, कृती, सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा, “माझा अभ्यास”, तंत्रशिक्षण अशा विविध शैक्षणिक गोष्टी सहज उपलब्ध होणार आहेत.
या डिजिटल उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. ॲपमध्ये AI आधारित तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचीही जोड देण्यात आली असून, विद्यार्थ्यांचे ग्रेडिंग अधिक अचूकपणे आणि तात्काळ करता येणार आहे.
NEP 2020 च्या शैक्षणिक धोरणानुसार हे ॲप तयार करण्यात आले असून, त्यामध्ये दैनिक पाठयोजना, सहायक उपक्रम, आणि अध्यापन सुलभ करणाऱ्या संसाधनांची माहिती दिली आहे. या लोकार्पण कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, आणि ॲपच्या निर्मितीत सहभागी शिक्षकवर्ग उपस्थित होते. नोडल अधिकारी म्हणून शिक्षक सुभाष राठोड यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती ठरू शकतो, असे मत अनेक शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.
—————————
हे शैक्षणिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्ययन अध्यापन करणे सुलभ होणार आहे. व्हिडिओ, पीपीटी, कृतीपत्रिक, क्विज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे कार्य या अँपच्या माध्यमातून सुलभ होईल असा विश्वास आहे.
…..पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद.