जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी कै. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा रायगडने १८ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामसभांवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भातील निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष धर्मा पवार आणि सरचिटणीस जितेंद्र गजानन म्हात्रे यांनी हे निवेदन दिले.
ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान कर्तव्यावर असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर हल्ला होऊन त्यांचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर घटना असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ग्रामसभांमध्ये यापूर्वीही वादविवाद, शिवीगाळ, धमकी, धक्काबुक्की आणि मारहाणीच्या घटना घडल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
संघटनेच्या निर्णयानुसार, १८ ऑगस्टपासून ज्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा नियोजित आहेत किंवा त्याबाबत नोटीस अथवा कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध झाली आहे, त्या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. संबंधित सरपंचांना संघटनेच्या निर्णयाची माहिती देऊन ग्रामसभा स्थगित ठेवण्याची विनंती करण्यात येणार आहे.
सरपंचांनी ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतल्यास ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेचे आयोजन अथवा संचालन करणार नाहीत. तसेच ग्रामसभेला उपस्थित राहणार नसून कोणत्याही ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाजही पाहणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
काही ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात खोट्या व तथ्यहीन तक्रारी करून त्यांच्यावर प्रशासकीय आणि सामाजिक दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ग्रामपंचायतींबाबत चुकीचे व्हिडिओ प्रसारित करून स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रतिमा मलिन केली जात असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी आणि कर्तव्य बजावताना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हा बहिष्कार ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा प्रशासनाच्या विरोधात नसून, कै. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूचा निषेध आणि ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. कै. पी. एन. पाटील यांना रायगड जिल्हा शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.