महाराष्ट्रातील नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेला राजकीय तिढा अखेर सुटला आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर शासनाकडून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. शासनाचे सहसचिव भ. बु. गावडे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिकच्या पालकमंत्रिपदी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, तर रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेना (शिंदे गट)चे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत संघर्ष
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर नोव्हेंबर २०२४ पासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच सुरू होती. महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा होती.
जानेवारी २०२५ मध्ये आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले, तर मुंबई-गोवा महामार्गावरही आंदोलन करत वाहतूक रोखण्यात आली होती. टायर जाळून या निर्णयाचा निषेध करण्यात आल्याने रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अधिकच चिघळला.
या राजकीय संघर्षानंतर पालकमंत्रिपदाचा निर्णय दीर्घकाळ प्रलंबित राहिला. अखेर आता भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर बदलली राजकीय समीकरणे
कोकण विभागातील विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना शिवसेनेकडून मिळालेल्या मदतीनंतर महायुतीतील राजकीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अनेकदा चर्चा झाल्याचे सांगितले जात होते.
अखेर या चर्चांना यश आले असून रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगडच्या विकासाला मिळणार गती?
पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्यासमोर जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासोबतच प्रशासन आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान असणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेले जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन आणि औद्योगिक विकास या मुद्द्यांवर नव्या पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला असून महायुती सरकारने प्रलंबित नियुक्त्यांवर निर्णय घेतला आहे.