मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र राज ठाकरे यांनी या भेटीत राजकीय नव्हे तर मुंबईच्या वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि सुनियोजित विकास यावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी शहरातील पायाभूत समस्यांवर मुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन दिले. वाहतूक व पार्किंगबाबत सविस्तर आराखडा मांडताना त्यांनी सांगितले की, “आज जिथे 50 लोक राहत होते, तिथे 500 लोक राहत आहेत. वाहने वाढली आहेत, पण रस्ते तसेच आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंग मोठा प्रश्न बनला आहे.” तातडीने नियोजन केले नाही, तर येत्या काळात ही समस्या गंभीर होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील डबल पार्किंग, नो-पार्किंगची वाढती समस्या सोडवण्यासाठी ‘स्मार्ट पार्किंग’ हा उपाय राज ठाकरेंनी सुचवला. छोटी मैदानं पार्किंगसाठी वापरता येतील, त्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच पार्किंगसाठी ठरावीक रंगाच्या रेषा पादचारी मार्गांवर काढाव्यात, जेणेकरून लोकांमध्ये शिस्त निर्माण होईल. “आपण कबूतर-हत्तीमध्ये अडकतो, पण मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो,” असे म्हणत त्यांनी शहर नियोजनाची तातडी अधोरेखित केली.