उरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता डी. एम. पाटील यांची भेट घेऊन खोपटा-कोप्रोली-चिरनेर मार्गावरील रस्ते, पूल व पाणी निचऱ्याच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले.
उरण पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील, माजी सभापती विश्वास म्हात्रे, सरपंच भास्कर मोकल, रूपेश पाटील, अॅड. पर्जन्य म्हात्रे, गजानन गायकवाड यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खोपटा-कोप्रोली-चिरनेर रस्त्यावरील खड्डे तातडीने भरणे, जुन्या खोपटा पुलाची दुरुस्ती पूर्ण करून वाहतुकीस खुला करणे तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली.
याशिवाय पाण्याचा निचरा न होणाऱ्या मोऱ्यांची दुरुस्ती, नवीन बॉक्स कलवर्ट उभारण्याची मागणीही करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता डी. एम. पाटील यांनी संबंधित कामांबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश देत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.