नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागल्यानंतर देशभरात या प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर काढलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या घटनेत काही विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन सुरू ठेवले असून विरोधी पक्षांनीही संसदेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. लोकशाहीत हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनावश्यक बळाचा वापर कोणाच्याही हिताचा नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांमुळे देशातील लाखो तरुण अस्वस्थ असल्याचे सांगत या आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून पाहण्याचा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.
पत्रात अण्णा हजारेंनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचाही उल्लेख केला आहे. “उत्तरदायित्व म्हणून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही. उलट इतर मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा कारभार जबाबदारीने करण्याचा संदेश जाईल. त्यामुळे सरकारचा कारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लिक प्रकरणांवर फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावे, विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा केली आहे.