रस्ते अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रस्ते अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या यंत्रणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रायगड ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस हद्दीतील मागील वर्षातील अपघातांचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी, पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक ठिकाणांवरील उपाय योजनांवर चर्चा झाली. ब्लॅकस्पॉट्सवर सुधारणा करून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी दर्शक फलक, वेग मर्यादा सूचना, अनधिकृत डिव्हायडर हटवणे व दोषींवर कारवाई यावर भर देण्यात आला.
तसेच काही व्यावसायिकांनी डिव्हायडर तोडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली. वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या होर्डिंग्ज हटवण्याचे आदेशही देण्यात आले. आगामी सण-उत्सव लक्षात घेता रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंते व रेसीलीयंट इंडिया नाशिक या NGO च्या प्रतिनिधींनी आपली मांडणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *