“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा सामाजिक संदेश देत आगरदांडा (ता. मुरूड) येथे उज्ज्वल जनसेवा कल्याण फाउंडेशनच्या वतीने आणि HCC कंपनीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिक, कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात एकूण ४२ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करत मानवसेवेचा आदर्श घालून दिला. गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अनेकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान रक्तदात्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमास उज्ज्वल जनसेवा कल्याण संस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र कीर, डॉ. देवेंद्र खरे, डॉ. अदिती कीर, संदीप पाटील, पंकजकुमार पांडे तसेच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते. तसेच सरकारी रक्तपेढीचे जिल्हा प्रमुख डॉ. दीपक गोसावी आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी वैद्यकीय सहकार्य करून रक्तसंकलनाची प्रक्रिया पार पाडली.
HCC कंपनीतर्फे संजय गोरे, जयकृष्णचंद्र तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून रक्तदान शिबिराला पाठिंबा दिला. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. रक्तदान केल्यानंतर सर्व रक्तदात्यांना फळे, ज्यूस आणि पाणी देण्यात आले. तसेच त्यांच्या समाजहिताच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानासारख्या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे. भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उज्ज्वल जनसेवा कल्याण फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.