मोठी स्वप्ने पाहा, योग्य दिशा निवडा; करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग | अमुलकुमार जैन
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट, झिराड आणि उत्कर्ष फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग-रेवस मार्गावरील होरायझन येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. चेंढरे जिल्हा परिषद क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती तथा विद्यमान सदस्य दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “मोठी स्वप्ने पाहा, योग्य दिशा निवडा आणि आयुष्यात मोठे यश मिळवा,” असा संदेश दिला. फक्त गुण मिळवणे पुरेसे नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीच्या मागे न जाता स्वतःची क्षमता, आवड आणि कौशल्य ओळखून करिअरची दिशा ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले.
उत्कर्ष फाऊंडेशनसोबत गेल्या चार वर्षांपासून संबंध असल्याचे सांगताना भोईर यांनी, या संस्थेमार्फत जिल्ह्यासह राज्य व देशातील ५०० हून अधिक युवकांना रोजगार मिळाल्याचा उल्लेख केला. आज अनेक विद्यार्थी लाखो रुपयांच्या पॅकेजवर कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. “आम्हाला शिक्षण कमी मिळाले, मात्र शिक्षणाची आवड कायम आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या सूचनेनुसार प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या शिंदे गटाच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. शिक्षणानंतर काय करायचे हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा करिअर मार्गदर्शन शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते,” असे सांगितले. निवडणुकीपूर्वी शहाबाज येथे घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात थेट मुलाखतीद्वारे ४० हून अधिक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी अलिबाग पंचायत समिती सदस्य जयंत वार्डे, वैशाली कटवते, प्रियंका गुंजाळ तसेच सुधीर कानविंदे उपस्थित होते. सुधीर कानविंदे यांनी युवकांनी सचोटीने आणि दर्जेदार काम करण्याची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले.