अंदमानात मान्सूनचं आगमन; कोकणसह महाराष्ट्रात लवकरच बरसण्याची शक्यता

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
संपूर्ण महाराष्ट्राला उकाड्याने हैराण केले असताना मान्सूनच्या आगमनाची बातमी नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा नैऋत्य मान्सून 16 मे 2026 रोजी अंदमानात दाखल झाला. अंदमान परिसरात मुसळधार पावसाच्या सरी, काळे ढग, वेगवान वारे आणि समुद्रातील उंच लाटांनी मान्सूनच्या आगमनाची जोरदार चाहूल दिली.
अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ही अनुकूल परिस्थिती कायम राहिल्यास 26 मेपर्यंत मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यानंतर गोवा आणि तळकोकणमार्गे त्याचा पुढील प्रवास सुरू होणार आहे.
सामान्यतः 1 जूनच्या आसपास केरळात दाखल होणारा मान्सून यंदा जवळपास सहा दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, 6 जूनपर्यंत कोकणासह राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.