मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
इंधन आणि परकीय चलन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन उच्चस्तरीय बैठकीत मंत्र्यांचे ताफे, विदेश दौरे, शासकीय विमानांचा वापर तसेच ऊर्जा बचतीसंदर्भात विविध उपाययोजनांवर निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाहेरील दौऱ्यांमध्ये निर्धारित संख्येपेक्षा अधिक वाहने ताफ्यात नसतील, याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांवर सोपवण्यात आली आहे.
तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द करण्यात आले असून अत्यावश्यक परिस्थिती वगळता शासकीय विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
याशिवाय मंत्री आणि अधिकाऱ्यांनी मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, असा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. बहुतांश बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ऊर्जा बचतीच्या दृष्टीने अनावश्यक होर्डिंग्ज आणि फ्लेक्सवरील कारवाई वाढवून डेकोरेटिव्ह लाईटिंगला आळा घालण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. शासनाकडून वितरित वाहनांचाही कोटेकोर आढावा घेण्यात येणार आहे.