Monsoon Updates : उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा; यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता

यंदा मान्सूनची दमदार आणि लवकर एन्ट्री
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
देशभरात वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता हवामान विभागाकडून मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा काही दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान परिसरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असून मे महिन्याच्या अखेरीसच पावसाची दमदार सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
IMD च्या माहितीनुसार, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे 20 मेच्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा तो तब्बल 5 ते 6 दिवस आधीच पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे केरळसह देशाच्या मुख्य भूभागावरही मान्सून वेळेआधी पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्रता कायम असून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.