मुंबई–विजयदुर्ग रो-रो फेरी लवकरच सुरू; कोकण प्रवास होणार ५–६ तासांनी जलद

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र मॅरीटाइम बोर्ड यांच्या पुढाकाराने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान ‘एम2एम प्रिन्सेस’ रो-रो फेरी सेवा सुरू होत आहे. या समुद्री मार्गामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर ५ ते ६ तासांनी कमी होणार असून कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये या सेवेची घोषणा करण्यात आली होती; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला. आता त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून १ मार्चपासून ही सेवा एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टर नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून निविदाही जारी करण्यात आली आहे. मार्च २०२६ पर्यंत चाचणी टप्पा पूर्ण करून एप्रिल २०२६ पासून नियमित सेवा सुरू करण्याचे संकेत आहेत.
सध्या रस्तेमार्गे मुंबई ते विजयदुर्ग हे सुमारे ४१२ किमी अंतर ९ ते १० तासांत पार करावे लागते, तर रेल्वेने सिंधुदुर्ग गाठण्यासाठी १० ते १२ तास लागतात. सुट्टी आणि सणासुदीच्या काळात हा वेळ अधिक वाढतो. समुद्रमार्ग उपलब्ध झाल्याने वाहतूक कोंडी टाळून सुमारे ७ तासांत आरामदायी प्रवास शक्य होणार आहे.
ही फेरी भाऊचा धक्का येथून सुटणार असून प्रवासी दुचाकी, चारचाकी तसेच बसही सोबत घेऊन जाऊ शकतील.
मार्च २०२६ मधील फेरीच्या तारखा
मुंबई ते विजयदुर्ग: 1, 4, 7, 11, 14, 18, 21, 25 मार्च
विजयदुर्ग ते मुंबई: 2, 5, 8, 12, 15, 19, 22, 26 मार्च
प्रस्तावित दररचना
  • इकॉनॉमी – ₹2,500
  • प्रिमियम इकॉनॉमी – ₹4,000
  • बिझनेस क्लास – ₹7,500
  • फर्स्ट क्लास – ₹9,000
  • बाईक – ₹1,000
  • सायकल – ₹600
  • चारचाकी – ₹6,000
  • बस – ₹13,000 ते ₹21,000
प्रवासाचे वेळापत्रक
  • मुंबईहून सुटण्याची वेळ: सकाळी 8 वाजता
  • विजयदुर्गला आगमन: दुपारी 3 वाजता
  • विजयदुर्गहून परतीची वेळ: दुपारी 12 वाजता
  • मुंबईत आगमन: सायंकाळी 7 वाजता
सुमारे ७ तासांचा हा समुद्री प्रवास कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि आरामदायी पर्याय ठरणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईकरांना समुद्रमार्गे कोकण गाठण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.