घाटमाथ्यावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून रायगड जिल्हा हादरला आहे. मिळगाव ठाकुरवाडी परिसरात मुंबई–पुणे जुना महामार्ग मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर खोल दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक MH 46 BU 7239 हा पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. चालक वीरेंद्र कुमार यादव (रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) वाहन चालवत होता. खोपोली एक्झिटवरून शिळफाटा मार्गे जात असताना मिळगाव ठाकुरवाडी जवळील तीव्र वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळला. वेग, घाटातील धोकादायक वळणे किंवा तांत्रिक बिघाड यापैकी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघात इतका भीषण होता की कंटेनरचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस चौकीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून चालकाला बाहेर काढण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घाटमाथ्यावरील हा मार्ग वळणावळणाचा व धोकादायक मानला जातो. विशेषतः मोठ्या व जड वाहनांसाठी येथे अधिक सतर्कता आवश्यक असते. या अपघातानंतर पुन्हा एकदा घाटातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, प्रशासनाने वाहनचालकांना वेग मर्यादेत वाहन चालवण्याचे आणि वाहनांची नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.