मुंबई–गोवा महामार्गावर डंपर आणि दुचाकीत भीषण अपघात; पेण-बळवली येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण तालुक्यातील आंबिवली फाट्याजवळ मुंबई–गोवा महामार्गावर डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक MH 46 BF 4590 आणि टीव्हीएस जुपिटर (MH 06 BY 7577) हे दोन्ही वाहने एकाच दिशेने जात असताना आंबिवली फाट्याजवळ अचानक अपघात झाला. या भीषण धडकेत दुचाकीस्वार डंपरच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा धर्मा पाटील (वय ५२, रा. बळावली-पेण ) असे असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली म्हणून ओळखले जाणारे कल्पेश ठाकूर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमी दुचाकीस्वाराला तातडीने पेण उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.