महाड तालुक्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत असताना आणखी एक घटना समोर आली आहे. माहेरहून सासरी जात असलेली ३६ वर्षीय विवाहित महिला रेखा देवराम सकपाळ अचानक बेपत्ता झाली असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
रेखा सकपाळ या महाड -आंबेशिवथर येथील माहेरकरिण असून त्यांचे सासर सातारा जिल्ह्यातील जोर येथे आहे. ६ मार्च रोजी त्या महाड येथे आल्या होत्या. त्यानंतर वाई–सातारा मार्गे सासरी जात असल्याचे सांगून त्या वडिलांच्या घरातून निघाल्या; मात्र त्या अद्याप घरी पोहोचलेल्या नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने वडील रविकांत रामचंद्र पवार यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा सकपाळ यांचा रंग गहूवर्गीय, उंची सुमारे चार फूट पाच इंच, चेहरा गोल व अंगाने मध्यम आहे. त्या जांभळ्या रंगाचा फुलांच्या नक्षीचा सलवार ड्रेस, लाल पायजमा आणि पिवळ्या रंगाची चप्पल घातलेली होती. तसेच उजव्या हातात पंचरंगी धागा आणि गळ्यात काळ्या मन्यांचे मंगळसूत्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिस हवालदार पवार तपास करत आहेत. दरम्यान, महाड–वाई–सातारा मार्गावर महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रेखा सकपाळ यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.