मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून राजापूर ते गुजरात अशी अवैध खैरकाताच्या अर्काची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यात आले. महाड एमआयडीसी पोलीस व वनविभागाच्या संयुक्त कारवाईत 240 ड्रम्ससह ट्रक जप्त करून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलादपूरच्या वनउपज तपासणी नाक्यावरून गुरुवारी सकाळी ट्रक बिनबोभाटपणे मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, सावध पोलीस हवालदार तेजस कदम व नारायण शिर्के यांनी सावित्री पुलाजवळ तपासणी दरम्यान संशयास्पद ट्रक अडवून तपासणी केली. या प्रकरणात वनक्षेत्रपाल राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या उपस्थितीत ट्रक आणि चालकाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
खैरतस्करांनी ड्रम्सच्या माध्यमातून खैरकाताचा अर्क वाहून नेण्याचा नवा मार्ग शोधला होता. या सर्वप्रकारात पोलीस आणि वनविभागाने समन्वयाने केलेल्या कारवाईचे यश पाहता यापूर्वी अनेक ट्रक्समधून ड्रमद्वारे खैर कात अर्काची वाहतूक करण्यात खैरतस्कर यशस्वी झाले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.