
माथेरान :
नेरळ (खांडा) परिसरातील अरुंद मार्गामुळे शासनाच्या मिनीबस सेवेला वारंवार अडथळे निर्माण होत होते. चालक व वाहकांना वाहन चालवताना स्थानिक वाहनचालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने शनिवार–रविवार या दिवशी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती.
पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने १० सप्टेंबर रोजी कर्जत आगारप्रमुख देवानंद मोरे यांची भेट घेतली. समितीने नेरळ–खांडा बस थांबा हलविण्यास विरोध नोंदवला तसेच बस चालक व कंडक्टर यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्याची मागणी केली. प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत सेवा देणे ही एसटी प्रशासनाची जबाबदारी असल्याचे समितीने लेखी निवेदनात स्पष्ट केले.
या निवेदनानंतर आगारप्रमुख देवानंद मोरे यांनी सदर निर्णय मागे घेतला असून मिनीबस सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी स्वतः नेरळ पोलीस प्रशासनालाही परिस्थितीबाबत कल्पना देण्याचे आश्वासन दिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी समितीचे कुलदीप जाधव, प्रदीप घावरे,चंद्रकांत जाधव, गिरीश पवार, राजेश चौधरी, दिनेश सुतार, मुकुंद रांजाणे हे सदस्य उपस्थित होते.
Related