समस्यांचे माहेरघर म्हणून माथेरानची ओळख होऊ लागल्याने त्या मार्गी लावण्यासाठी माथेरान भाजप शहरच्या वतीने कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक राहूल इंगळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माथेरान मधील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शहरातील करदात्यांची अभय योजने अंतर्गत शास्ती माफ करावी या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे निवेदन सादर करण्यात आले तसेच शहराला भेडसावणाऱ्या समस्यांचे गाऱ्हाने सुद्धा मुख्याधिकारी यांकडे व्यक्त केले.
यामध्ये प्रामुख्याने काळोखीतील अस्तित्वात असलेला जुना रस्ता पुन्हा सुरु करावा जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल, दस्तुरी नाका येथील नागरिक व पर्यटकांना ऐन गर्दी मध्ये त्रास सहन करावा लागत असल्याने पर्यटकांना जाण्याकारिता लगतच असलेल्या जागेतून पर्यायी मार्ग बनवावा, शहरातील अस्वच्छता, शहरातील सर्व मार्गांवरील वीज व्यवस्था ऐन गणेशोत्सवा पूर्वी सुरळीत करावी, प्रेक्षनीय स्थळाकडे जाणारे रस्ते (डब्ल्यू बी.एम ) चा फॉर्मुला वापरून दुरुस्त करावेत,अशा सर्व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व समस्यावर मुख्याधिकारी यांनी सकारात्मकता दर्शविली असून लवकरच ही कामे मार्गी लावली जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, किरण चौधरी, चंद्रकांत जाधव, शैलेश चाफेरकर,सुभाष भोसले, संदीप कदम यांसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.