माथेरानमधील अश्वांसाठी विशेष आरोग्य शिबिर; ११ ऑगस्टला होणार तपासणी

#माथेरानमधील अश्वांसाठी विशेष आरोग्य शिबिर
रायगड | अमुलकुमार जैन
 माथेरानच्या पर्यटन व्यवसायाचा अविभाज्य भाग असलेल्या अश्वांच्या आरोग्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष लक्ष दिले आहे. अश्वांचे आरोग्य चांगले राहण्यासोबतच संसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान व्हावे, यासाठी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पशुवैद्यकीय चिकित्सालय, माथेरान येथे अश्व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात अश्वांची आरोग्य तपासणी, ग्लँडर्स रोगाच्या तपासणीसाठी रक्तजल नमुने संकलन, अँटी रेबीज लसीकरण तसेच जंतनाशक औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. माथेरानच्या पर्यटनात घोड्यांना महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. या माध्यमातून अश्वमालकांना पशुधनाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकरी व पशुपालकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. या शिबिराचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून  या कार्यक्रमाला समाजकल्याण सभापती नारायण राजाराम डामसे, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले हे उपस्थितीत रहाणार आहेत. माथेरानमधील सर्व अश्वमालकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.