सोमवार दि.४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील उतेखोल परिसरात हवेत धुकं सदृष्य धुरंक जाणवत होत. आसमंतात धुरकट वासाने झोपेत श्वसनास त्रास, घसा खवखवत खोकला व श्वास गुदमरण्या सारखा त्रास अनेकांना जाणवल्याच्या नागरिकांमधुन तक्रारी होत आहेत. माणगांव शहरात दररोज गोळा होणाऱ्या एकूण साडेनऊ टन कचऱ्यात काही टन प्लास्टिक असून ते उतेखोल आश्रम शाळेजवळील मोकळ्या माळावर साठविले जाते. या ठिकाणी अधुन मधुन आगीच्या घटना घडत आहेत.
नगर पंचायतीकडे प्लास्टिकवर प्रक्रियेसाठी सध्या कुठलीही यंत्रणा येथे कार्यरत नाही. त्यामुळे हे प्लास्टिक जाळले जात असावे, अशी शक्यता या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. आगीचा धूर, दुर्गंधी यामुळे माणगांव शहर परिसरातील वस्त्यांतील घरांमध्ये श्वसनाचे विकार होत असल्याचे वास्तव आता बोलले जात आहे. चुकीच्या प्रकारे कचऱ्या मधिल प्लास्टिक जाळले जात असल्याने या परिसरातील नागरिकांना भविष्यात दमा, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते कि काय अशी भिती व्यक्त होत आहे.
कचऱ्याची दुर्गंधी व धुराची समस्या परिसरातील आदिवासी वाडी, आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थी व कर्मचारी, दत्तनगर रहिवाशी, अमित काॅम्प्लेक्स, उतेखोलगाव, साईनगर, वाकडाईनगर जवळपास निम्म्या माणगांव शहरातील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे. त्यात भर येथील आगीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जळते. आता मार्च महिना उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक जळताना त्यातून कार्बन डाय ऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साइड, अस्थिर सेंद्रिय रसायने (VOCs) आणि पॉलीसायक्लिक सेंद्रिय पदार्थ हे आरोग्यासाठी घातक वायू बाहेर पडतात. यामुळे कॅन्सरचीही शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
श्वसनाचे विकार, आवाज बसणे, डोळ्याचे आजार, खाज आदी रोगांनी या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्लास्टिकला लागलेल्या आगीमुळे सेंद्रिय पदार्थ वातावरणात मिसळतात आणि हवेच्या माध्यमातून ते सर्वदूर वातावरणात गोळा होते. शेतातील धान्याच्या माध्यमातून तसेच तलाव, नदीच्या पाण्याच्या माध्यमातून मानवी शरीरातही जाते. त्यामुळे ज्या परिसरात प्लास्टिक जाळले जाते तेथेच नव्हे तर लांब राहणाऱ्या नागरिकांच्याही आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
या परिसरात कचरा पेटविण्याच्या घटना आता नव्या राहिल्या नाहीत. त्यामुळेच घनकचरा व्यवस्थापनचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कुठलाही कचरा जाळणे हा गुन्हा आहे. मात्र, आगीत कचरा जळल्याचे चित्र भासवून घनकचरा व्यवस्थापन कायद्याची ऐशीतैशी होत आहे.
एवढेच नव्हे राष्ट्रीय हरित लवादानेही यापूर्वीच प्लास्टिक कचरा जाळल्यास ५ ते २५ हजारांचा दंड ठोठावण्याबाबत स्पष्ट केले आहे. मात्र माणगांव नगरपंचायत प्रशासन आता कचरा डंपिंग आगीच्या घटना कशा रोखणार असा सवाल ऐरणीवर येत सार्वजनिक आरोग्याची समस्या भविष्यात उग्ररुप धारण करेल. या परिसरातील आश्रम शाळेतील मुलांना आता श्वसनाच्या समस्या व मळमळ उलटी होणे या सारखा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथिल शाळा व्यवस्थापकांनी नगर पंचायतीस वारंवार ही बाब लक्षात आणुन दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यात मुंबई-गोवा रस्त्याचे चालू असलेल्या कामामुळे व शहरात अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे, सामाजिक आरोग्याची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता मोठमोठी व्यावसायिक बांधकामे सुरु आहेत, त्यातून निर्माण होणारी धूळ कचऱ्यामुळे माणगांवकरांचे आरोग्य आधीच धोक्यात आले आहे, त्यात कालवा सफाईच्या निमित्ताने कालवा रोडवर काढलेला गाळ सुकून तिथेदेखील स्थानिकांना धुळीमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत, माणगांवाच्या एकही लोकप्रतिनिधीस माणगांवचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात असताना त्याचे सोयर सुतक नसल्याचे नागरिक संतापाने बोलत आहेत, नुसताच राजकीय कलगी तुरा सुरु असून माणगांव मध्ये उद्भवत असलेल्या भयानक समस्यांकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष होत आहे.
प्लास्टिकच्या ज्वलनामुळे वातावरणात आरोग्यास नुकसानकारक सुक्ष्म तत्त्व बाहेर येतात. हि सूक्ष्म तत्त्व येथे जवळुनच वाहणाऱ्या काळनदीमध्येही मिसळुन पाण्याद्वारे माशांच्या शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. व पुढे हे मासे जेवणातून घेतल्यास खाणाऱ्याच्या शरीरात हे तत्त्व अधिक प्रमाणात वाढते. या प्रक्रियेला तज्ञांच्या भाषेत बायो मॅग्निफिकेशन प्रक्रिया असे म्हटले जाते. यामुळे अनेक असाध्य रोगाची लागण होत असते.