मुंबई -गोवा महामार्गावर मोकाट गुरे ही वाहनचालकांची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस महामार्गावर या मोकाट गुरांचे बस्तान वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही मोकाट गुरे सरळ रस्त्याच्या मधोमध बसण्याचा मार्ग अंवलंबतात. परिणामी वाहतुकीची समस्या देखिल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर वाहन चालकास अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये मोकाट गुरे आणी शेतक-यांच्या गुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे या मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधुन होत आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूकीसाठी महत्वाचे असे नाके समजले जाणारे वाकण, सुकेळी, खांब, कोलाड नाक्यावर रस्त्यातच मोकाट गुरे ही उभी अथवा ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित गुरांच्या मालकांचा निष्काळजीपणा येथिल प्रवाशीवर्गाच्या जीवाशी अक्षरशः खेळ खेळत असल्याने प्रवासी , वाहनचालक, दुचाकीस्वार मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.
याच मोकाट गुरांच्या भर रस्त्यामध्येच झुंजी होत असतात. त्यामुळे यामध्ये दुचाकी वाहनांचे आरसे, क्लज, इंडिकेटर यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी देखिल रस्त्यावर उभी असलेली गुरे ही अंधारातून दिसण्यात येत नसल्यामुळे वाहनांना अपघातात होऊन अपघातांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या मोकाट गुरांच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधुन होत आहे.