महाड तालुक्यात चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यास परवानगी दिल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे त्यामानाने वृक्ष लागवडीकडे लक्ष देण्यास वन खात्याच्या महाड कार्यालयाला अपयश आल्याचे चित्र महाड तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
महाड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यापासून थेट शिवथरघळपर्यंत आणि वरंध घाट व विन्हेरे विभाग, खाडीपट्टा, वहूर, दासगाव या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली आहे. महाड वन विभागाकडून वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारांना ज्या ठिकाणी वृक्षतोड करायचे आहे तेथील परवाना दिला जातो मात्र दिलेल्या परवानापेक्षा अधिक वृक्षतोड केली जात आहे.
खाजगी जमिनीतून वृक्ष तोडून ते परवाना दिलेल्या मालकीमध्ये आणून टाकायचे व पुरावा नष्ट करायचा हा गोरख धंदा मोठ्या प्रमाणावर विन्हेरे विभागात मागील चार महिने खुलेआमपणे जंगल ठेकेदार करीत आहेत. त्यांना अभय देण्याचे काम महाड वन खात्याकडून झाल्याने मागील अनेक वर्षातील वृक्षतोड एकट्या विन्हेरे विभागात बेकायदेशीर रित्या झाल्याची चर्चा या परिसरातील ग्रामस्थांकडून ऐकण्यास मिळत आहे.
महाड तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खाजगी मालकीची झाडे जळाऊ लाकडांसाठी तोड करण्याच्या उद्देशाने खाजगी जंगल ठेकेदार अल्प मोबदल्यात शेतकऱ्यांकडून विकत घेऊन मग हे जंगल ठेकेदार परवानाधारक असलेल्या वृक्षतोडीच्या लाकडांमध्ये समाविष्ट करतात मात्र याबाबत पूर्ण कल्पना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांना असतानाही आज पर्यंत चालू वर्षात एकाही अनधिकृत वृक्षतोड अशी कारवाई वन विभागाकडून झालेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड विभागात एका शेतकऱ्याने स्वयंपाकासाठी जंगलात पडलेली सुकी लाकडे घराकडे पिकअप मधून घरी घेऊन जात असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्याच्यावर कोळसा वाहतूक करीत असल्याचा गुन्हा दाखल करून त्या शेतकऱ्याची मालवाहू पीकअप व्हॅन नाहक अडकवून ठेवण्याचा प्रकार केला आहे. वास्तविकता या गुन्ह्यात पंचनामा केला त्यावेळेला घरच्या इंधनासाठी जळाऊ लाकडे असल्याचे असताना देखील कोळसा वाहतूक करतो असा गुन्हा दाखल करण्याची प्रताप महाडच्या वनाधिकाऱ्यांनी केली आहे.
खैर व सागवानी लाकडाची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड?
महाड वनविभागाच्या आशीर्वादाने जळाऊ लाकडाच्या (किटा) वृक्षतोडीसाठी वन विभागाकडून परवानगी देण्यात आली मात्र या परवानगीच्या नावाखाली अनेक जंगल तस्करांनी महाड तालुक्यात खैर व सागवानी वृक्षांची अवैधपणे वृक्षतोड केली असून त्याची गणती करता येणार नाही एवढी संख्या असल्याचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
महाड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर खैराची तस्करी होत असताना वनविभागाच्या अधिकारी सुस्त झोपी गेले आहेत महाड तालुक्यातून होणारी खैराच्या वृक्षांची तोड केल्यानंतर ही खैराची लाकडे रत्नागिरी जिल्ह्यातील महाड तालुक्याला लागून असणाऱ्या खेड येथील कात फॅक्टरी दिली जातात व ती छोट्या पिकप रिक्षातून व मालवाहू पिकअप व्हॅन मधून रात्री बाराच्या नंतर पहाटे पाच वाजेपर्यंत त्याची वाहतूक होते मात्र याची कल्पना परिपूर्ण वन खात्याचे अधिकाऱ्यांना असताना चालू वर्षात किती खैर तस्करांवर कारवाई केली हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे.
एकंदरीत आंधळ दळतय कुत्र पीठ खातय आता वनविभागाचा कारभार महाड तालुक्यात आहे. जेवढ्या प्रमाणात वृक्षतोडीला परवानगी दिली आहे त्या प्रमाणात तरी वृक्ष लागवड करण्याचे सौजन्य महाड वन विभागाकडून होत नाही केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड केल्याचे पावसाळ्यानंतर दाखवण्यात येईल असे वनविभागातल्या कर्मचाऱ्यांकडून खाजगीत चर्चिले जात आहे.